तुम्ही जामिनावर सुटला आहात याचे भान ठेवा, अन्यथा महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा


पुणे – आज देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून यात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. पण भाजपचे आव्हान फोडून काढत पुन्हा एकदा सत्ता राखण्यात तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी यश प्राप्त केल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. याच निकालावर बोलत असताना मंत्री छगन भुजबळ यांना राज्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी रोखठोक इशारा दिला आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. भुजबळ यांनी यात भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगालमध्ये जवळपास दिवसाआड सभा घेत होते. पश्चिम बंगालमध्ये त्यांचे ८ ते १० मंत्री ठाण मांडून बसले होते. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाल्याचे टोला भुजबळ यांनी लगावला होता. चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भुजबळ यांना थेट इशाराच दिला आहे.

पंढरपूरच्या निकालावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर बाहेर आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचे असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला, असे चंद्रकात पाटील म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असे कसे होऊ शकते.

बंगालमधील पराभवाचे दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करत असतो. निवडणुका आम्ही फार गांभिर्याने घेतो आणि पराभव जरी झाला असला तरी भाजपविरोधात सगळे एकत्र आले होते, हे लक्षात घ्यायला हवे. तिथे वर्षानुवर्षे सरकारमध्ये असलेले नाहीच्या बरोबरीने दिसत असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.