ममता दिदींचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, तर नंदीग्राममघ्ये फेर मतमोजणीची मागणी


नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहिर होत आहेत. ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमुल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये हॅटट्रिक मारताना दिसत आहे. या निवडणूक निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेसच्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन, केंद्र पश्चिम बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करत राहील, असे आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

केरळमध्ये मोठा विजय मिळविणारे मुख्यमंत्री पी. विजयन आणि तामिळनाडूमधील विजयाबद्दल डीएके प्रमुख एमके स्टॅलिन यांचेही पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. पश्चिम बंगालमधील एकूण 294 जागांपैकी 292 जागांवर मतदान झाले. त्यापैकी टीएमसीला 200 हून अधिक जागा मिळतील असे दिसत आहे.


दरम्यान देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. पण आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती.

ममता बॅनर्जी याबाबत बोलताना म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात न्यायालयात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भातील ट्वीट एएनआयने केले आहे. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.