ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग


नवी दिल्ली – आज पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत. त्याची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाली आहे. पण तत्पूर्वीच सोशल मीडियावर ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रीक व्होटींग मशिन्सविरोधात आवाज उठवला जात आहे. या निवडणुकीच्या प्राथमिक मतमोजणीचे कल हाती येण्याआधीपासूनच ईव्हीएमचा वापर करुन निवडणुका घेणे बंद केले पाहिजे, असे म्हणणारा, #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

#BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग वापरुन शनिवार सायंकाळपासूनच ट्विट करण्यात येत आहेत. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच आज सकाळी आठवाजेपर्यंत या हॅशटॅगवर जवळजवळ ३५ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

या निवडणुकांकडे पूर्व आणि दक्षिणेकडील पक्षविस्ताराची संधी म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेला भाजप पाहात आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सातत्याने सांगितले होते की, लोकसभेच्या ३०३ जागा जिंकणे हा पक्षाच्या यशाचा कळस नव्हे. भाजपला देशभर विस्तारण्यास वाव आहे, त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांच्या या मेहनतीला किती यश मिळेल हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.