केंद्रीय तज्ज्ञांचा इशारा; पुढील आठवड्यात देशात कोरोबाधितांच्या सर्वोच्च रुग्णवाढीची शक्यता!


नवी दिल्ली – देशात आत्तापर्यंतची सर्वोच रुग्णसंख्या आणि २४ तासांतील जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या शुक्रवारी नोंदवली गेली. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पण, देशभरात पुढील आठवड्यात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्र सरकारला कोरोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी दिला आहे.

त्याचबरोबर गेल्या महिन्यात झालेल्या चर्चेदरम्यान, आपण दीर्घ काळासाठीच्या उपाययोजनांमध्ये फार वेळ न घालवता आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीवर तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचा संदेश देखील या पथकाने केंद्र सरकारला दिला होता. एकीकडे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीच्या डोसचा अपुरा पुरवठा असताना कोरोनाबाधितांच्या वाढीचे आव्हान समोर उभे ठाकणार असल्याचा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनासंदर्भात केंद्र सरकारला सल्ला देणाऱ्या संशोधकांच्या पथकाचे प्रमुख एम. विद्यासागर यांनी यासंदर्भात राउटर्सशी बोलताना माहिती दिली आहे. आमचा अंदाज आहे की पुढील आठवड्यात ३ ते ५ तारखेच्या दरम्यान भारतात रोजची कोरोना रुग्णसंख्या सर्वोच्च नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

आम्ही गेल्या महिन्यात २ एप्रिलला झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले होते की सरकारने जुलै किंवा ऑगस्टमध्ये अंमलात येईल, अशा उपाययोजनांवर काम करणे अनावश्यक आहे. कारण तोपर्यंत दुसली लाट संपलेली असेल, पण पुढचे ४ ते ६ आठवडे आपण हा लढा कसा देणार आहोत, ते ठरवणे आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात खूप सारा वेळ खर्च करू नका. कारण हे संकट आत्ता तुमच्या समोर उभे असल्याचे ते विद्यासागर यांनी सांगितले.