शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त


नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता देशात रुग्ण संख्येची त्सुनामी येत असल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात 4,01,993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशात शुक्रवारी जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्याआधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. दिवसेंदिवस कोरोनाबाधिततांची संख्या वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना शुक्रवारी दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल 69 हजार 710 कोरोना रुग्णांना शुक्रवारी बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत राज्यात एकूण 38,68,976 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.06% एवढे झाले आहे. तर आज राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झाले. दरम्यान आज 828 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.5% एवढा आहे.