मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची नागरिकांना दोन मास्क वापरण्याची कळकळीची विनंती


मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येत असतानाही काही ठिकाणी मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणा आताही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या यंत्रणेच्या कामात हाच बेजबाबदारपणा अडथळे निर्माण करत आहे. हेच चित्र पाहून महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईवरील संकट आणखी वाढून न देण्यासाठी नागरिकांना दोन मास्क वापरण्याची कळकळीची विनंती केली.

महापौरांनी ‘मी हात जोडून विनंती करते, सर्वांनी एका वेळी दोन मास्कचा वापर करा. त्याचबरोबर गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, अशा शब्दांत सूर आळवल्याचे पाहायला मिळाले. सोबतच नागरिकांकडून त्यांनी सहकार्याची अपेक्षाही केली. सध्याच्या घडीला कोरोना काळात एकाच मास्कचा वापर न करता एका वेळी दोन मास्कचा वापर करत नाक आणि तोंड झाकण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचा पुनरुच्चार महापौरांनीही केला.

18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात लस देण्याची मोहित प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यासंदर्भात राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याचे महापौर पेडणेकर म्हणाल्या. लसीकरणाची प्रक्रिया केंद्र सरकारच्या अख्त्यारित असल्यामुळे ज्यांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे आणि ज्यांना मेसेज आला आहे, त्यांनीच लसीकरण केंद्रावर जायचे आहे, मेसेज न दाखवल्यास लसीकरण होणार नसल्याचे सांगत सर्वांनीच या टप्प्यावर सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.