सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन डेव्हिड वॉर्नरची गंच्छती


हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद संघावर आयपीएल 2021 मधील खराब कामगिरीचा परिणाम होऊ लागला आहे. 6 पैकी 5 सामन्यांमध्ये या संघाने पराभव पत्कारला आहे. 2 गुणांसह हा संघ गुणतालिकेत तळाशी असल्यामुळेच आता संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवून केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सर्व सामन्यांमध्ये संघाची कमान आता केन विल्यमसन सांभाळेल.

कर्णधारपदापासून डेव्हिड वॉर्नरला मुक्त करण्यात आले आहे, तर केन विल्यमसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, याबाबत सनरायझर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंटने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी संघाच्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आयपीएलमधील पुढील सामन्यांमध्ये केन विल्यमसन हैदराबादच्या संघाचे नेतृत्व करेल.

सनरायझर्स हैदराबादने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 2 मे रोजी हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्यात हैदराबादच्या संघात परदेशी खेळाडूंचे वेगळे कॉम्बिनेशन पाहायला मिळू शकते. याचाच अर्थ जे परदेशी खेळाडू रेग्युलर संघात आहेत, त्यांचे प्लेईँग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आहे.