ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी गेल्यास दंड आणि तुरुंगवास?

भारतात करोनाने कहर केला असतानाच आयपीएल मधून मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर वेगळेच संकट उभे राहिले आहे. सद्य परिस्थितीत मायदेशी परतू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना सरकार कमाल ६६ हजार डॉलर्स दंड ठोठावेल अथवा पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल अशी बातमी सिडनी हेरॉल्डने दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या नाईन न्यूजवर शुक्रवारी ही  बातमी दिल्याचे सिडनी हेराल्डने म्हटले आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियन सरकार परदेशातून मायदेशी परतणाऱ्या नागरिकांना भारी दंड किंवा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे भारतात आयपीएल खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी जायचे असेल तर कुठे तरी वेगळ्याच ठिकाणी विलगीकरणात राहावे लागेलच पण दंड किंवा तुरुंगवास अशी कारवाई सुद्धा त्यांच्यावर होऊ शकेल असे संकेत दिले जात आहेत.

भारतात सध्या १४ खेळाडू आयपीएल खेळत आहेत शिवाय कोच, कॉमेंटेटर, अन्य सपोर्ट स्टाफ म्हणूनही बरेच ऑस्ट्रेलियन भारतात आहेत. सध्याच्या परिस्थितीत भारतातून मायदेशी परतणे हा गुन्हा मानला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सद्य स्थितीत ३६ हजार ऑस्ट्रेलियन परदेशात आहेत तर भारतात ९ हजार ऑस्ट्रेलियन आहेत. त्यात आयपीएल खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी मागेच आयपीएल खेळायला गेलेले खेळाडू त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर गेले असून मायदेशी परतण्याची सोय त्यांची त्यांनी करायचे आहे असे स्पष्ट केले होते.