या शिवमंदिरात पूजा केल्यास मिळतो शाप


केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात देवी देवतांची मंदिरे आहेत. आणि भाविक आवर्जून तेथे पूजा अभिषेक करतात. या मागे जीवनात सौख्य आणि समृद्धी लाभावी आणि संकटातून मुक्ती मिळावी अशी भावना असते. मनापासून केलेल्या उपासनेला देवाचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे. मात्र भारत हा अनेक रहस्ये पोटात दडवून ठेवलेला देश आहे. भारतात हजारोनी शिवमंदिरे आहेत आणि तेथे नियमाने पूजा अर्चा केली जाते. उत्तरखंड राज्यात एक शिवमंदिर असे आहे, जेथे पूजा केल्यास शाप मिळतो अशी कथा सांगितली जाते. हे मंदिर पिथोरागड भागात असून त्याला हतिया देवल असे म्हटले जाते.

हे मंदिर प्राचीन आहे. मंदिरात शिवलिंग आहे, अनेक लोक हे मंदिर पाहण्यासाठी आवर्जून येतात मात्र कुणीही येथे पूजा अभिषेक करत नाही. असे सांगतात या मंदिरातील शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा केलेली नाही. याची कथा अशी सांगितली जाते हे मंदीर एकच हात असलेल्या शिल्पकाराने एका रात्रीत बांधले पण शिवपिंड करताना त्याने ते चुकीच्या दिशेला केले. अखंड एकाच पाषाणात हे मंदिर कोरले गेले आहे. विपरीत दिशेला शिवलिंग असल्याने ते फलदायी मानले जात नाही तर अश्या लिंगाची पूजा कष्टकारक मानली जाते.


कत्युरी शासन काळात त्या राजांना स्थापत्य कलेची खूप आवड होती. त्याबाबत ते नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करत असत. एक गावात एक मूर्तिकार होता तो खडकातून अप्रतिम मूर्ती कोरत असे. पण अपघातात त्याचा एक हात गेला. तेव्हा गावकरी त्याला आता हा काही कामाचा राहिला नाही म्हणून हिणवू लागले. त्यामुळे चिडलेल्या या मूर्तीकाराने एकाच हाताने एका रात्रीत खडक फोडून हे मंदिर बनविले. मात्र शाळुंका दक्षिणोत्तर ठेवताना उत्तरेऐवजी दक्षिणेकडे ठेवली गेली आणि हे मंदिर पूजेसाठी निषिद्ध मानले जाऊ लागले. एकच हाताने हे मंदिर बनविले गेल्याने त्याला हतिया देवल असे नाव पडले.

Leave a Comment