या रिसोर्टमधील सोन्याच्या बाथटबमध्ये स्नानासाठी मोजावे लागणार ताशी तीन हजार रुपये


जपानच्या एका हॉटेलमध्ये ग्राहकांना ऐषारामी स्नानाचा आनंद देण्याच्या उद्देशाने अठरा कॅरट सोन्याने मढविलेला बाथटब तयार करण्यात आला आहे. हा अतिशय किंमती बाथटब लांबीला १३० सेंटीमीटर (४.२ फुट) असून, याची खोली ५५ सेंटीमीटर ( दोन फुट) आहे. सुमारे १५४ किलो सोन्याने हा बाथटब मढविण्यात आला आहे. इतक्या मोठ्या बाथटबमध्ये बसून दोन वयस्क मंडळी आरामात श्रीमंती स्नानाचा आनंद घेऊ शकतात. हा बाथटब जपानमधील नागासाकी शहरातील ‘हॉट स्प्रिंग्ज’ नामक रिसोर्टमध्ये बसविण्यात आला आहे.

हा खास बाथटब डिझाईन करणाऱ्या डिझायनर्सना हा टब तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागला असून, या टबच्या निर्मितीसाठी सुमारे ७.१५ मिलियन डॉलर्स, म्हणजेच साधारण पन्नास कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आजवर जगामध्ये कुठे न बनविला गेलेला हा सोन्याचा बाथटब असून, यामध्ये स्नान करण्याचा आनंद ग्राहक नक्कीच घेतील अशी खात्री या रिसोर्टच्या व्यवस्थापनाला आहे. या बाथटबमध्ये स्नान करण्यासाठी ग्राहकांनी आगाऊ नावनोंदणी करायची असून, एका तासापासून दहा तासांपर्यंत स्नानाची वेळमर्यादा ग्राहकांना देण्यात आली आहे.

या राजेशाही बाथटबमध्ये स्नान करण्यासाठी ग्राहकांना दर तासामागे ५,४०० येन, म्हणजेच ४८ अमेरिकन डॉलर्स मोजावे लागणार आहेत. भारतीय चलनामध्ये ही रक्कम तीन हजार रुपयांपेक्षा थोडी अधिक आहे. रिसोर्टच्या व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार हा बाथटब मुख्यत्वे चीन आणि दक्षिण कोरियामधून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने बनविण्यात आला आहे. या बाथटबची नोंदणी ‘गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही झाली असल्याचे रिसोर्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment