भुताच्या वास्तव्यामुळे जपानचे पंतप्रधान निवासस्थान रिकामेच

जपानच्या पंतप्रधानांसाठी २००२ साली बांधले गेलेले भव्य निवासस्थान ‘सोरी कोतेई’ रिकामेच असून गेल्या १० वर्षात येथे कुणी पंतप्रधान राहिलेला नाही. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनीही या निवासस्थानी वास्तव्य केले नव्हते आणि आता नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीही पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्याला ८ महिने लोटूनही अजून नॅशनल डायट बिल्डिंग मधील क्वार्टर मधेच राहणे पसंत केले आहे.

या इमारतीचा इतिहास हिंसक आहे. ही सहा मजली भव्य, सुखसुविधानी परिपूर्ण इमारत असून या इमारतीविषयी अनेक अफवा रुजल्या आहेत. या इमारतीत भूतांचा संचार असल्याची बोलवा आहे. या जागी १९३२ मध्ये सैन्याने तख्तापालट करताना पंतप्रधान ओकाडा यांना नेव्ही ऑफिसरच्या एका गटाने गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी सैन्याने केलेल्या बंडात ओकाडा यांच्या मेव्हण्यासाठी चार जणांची हत्या केली गेली होती.

२००१ ते २००६ या काळात पंतप्रधान असलेले कोईजुमी यांनी एका शिंटो पुजाऱ्याला बोलावून तेथील भूतबाधा नष्ट करण्यासाठी काही धार्मिक कृत्ये केली होती असे सांगितले जाते. सध्या विरोधी पक्ष नेते असलेले योशीहिको नोडा हे या निवासस्थानी राहिलेले शेवटचे पंतप्रधान आहेत. ते २०१२ पर्यंत पंतप्रधान होते. त्यानीच सध्याचे पंतप्रधान सुगा यांना ते पंतप्रधान निवासस्थानात का राहायला जात नाहीत असा प्रश्न केल्यावर पुन्हा एकदा हे निवासस्थान चर्चेत आले आहे.