बजाज ऑटोच्या प्रमुखपदाचा राहुल बजाज यांचा राजीनामा

गेली ५० वर्षे बजाज ऑटोच्या कारभाराची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या राहुल बजाज यांनी अध्यक्षपद तसेच नॉनएग्झीक्यूटीव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे. १ मे पासून नीरज बजाज कंपनीचे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. नीरज कंपनीचे प्रमोटर डायरेक्टर सुद्धा आहेत. ६७ वर्षीय नीरज यांनी ३५ वर्षे कंपनीत सेवा दिली असून त्यांनी युएस हॉवर्ड बिझिनेस स्कूल मधून एमबीएची पदवी घेतली आहे.

राहुल बजाज १९७२ पासून नॉनएग्झीक्युटीव्ह चेअरमन म्हणून काम करत होते. गेली ५० वर्षे त्यांनी कंपनीची धुरा सांभाळली आहे. ८२ वर्षीय राहुल यांनी ३० एप्रिल रोजी निवृत्त होत असल्याची घोषणा करून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. कंपनीत ते यापुढे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

राहुल बजाज यांच्या कार्यकाळात कंपनीने यशाची अनेक शिखरे गाठली. अनेक ट्रेंड सेट केले. दुचाकी म्हटले की बजाज असे समीकरणच बनले होते. स्कुटरची क्रेझ कमी होतेय असे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने बाईक उत्पादन करण्याचा निर्णय घेऊन अमलात आणला होता. बजाज ऑटो कंपनीला ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत. बजाज समूहाची नेटवर्थ ६.५ अब्ज डॉलर्स म्हणजे ४८ हजार कोटी इतकी आहे.