करोना काळातील दानामुळे पुन्हा ट्रेंड होताहेत अझीम प्रेमजी

करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारत खुपच प्रभावित झाला असताना उद्योग जगताने मदतीचा हात खुला केला आहे. पण विप्रोचे संस्थापक अध्यक्ष दानशूर अझीम प्रेमजी एकाएकी सोशल मीडियावर गुरुवारी ट्रेंड होऊ लागले आहेत. आम आदमी पक्ष सोडलेले आशिष खेतान यासाठी कारणीभूत ठरले आहेत. खेतान यांनी एक ट्विट करून गतवर्षी अझीम प्रेमजी यांनी करोना काळात दररोज २२ कोटी या सरासरीने ७९०४ कोटीचे दान दिल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर प्रेमजी यांच्यावर समाजाच्या सर्व थरातून शुभेच्छा, अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

खेतान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २०१९-२० या काळात प्रेमजी यांनी करोना विरुद्धच्या लढाई साठी ७९०४ कोटी दिले आहेत. एडलगिव्ह हुरून इंडियाच्या २०२० च्या दाता सूचीमध्ये प्रेमजी अग्र स्थानी आहेत. त्यापाठोपाठ एचसीएलचे शिव नाडर, रिलायंसचे मुकेश अंबानी अनुक्रमे दोन व तीन नंबरवर आहेत. बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला चार नंबरवर तर वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल पाच नंबरवर आहेत. या यादीत दानशूर यादीत मुंबईचे ३६, दिल्लीचे २०. बंगलोरचे १० दानशूर सामील आहेत. त्यांनी २०२० मध्ये एकत्रित १२०५० कोटी रुपये दान म्हणून दिले आहेत.