आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार


मुंबई : आज संध्याकाळी राज्यातील जनतेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण असो, लॉकडाऊन असो किंवा सरकारची विविध धोरणे असो की, कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची सरकारची तयारी यावर मुख्यमंत्री भाष्य करण्याची शक्यता आहे.

उद्या महाराष्ट्र दिन आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण आलेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊनही जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा शिकून राज्य सरकारने तिसऱ्या लाटेसाठीही तयारी सुरु केली आहे. यासर्व मुद्द्यांवर आज राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री संवाद साधू शकतात.

राज्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पण, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. ऑक्सिजन, औषधे, इंजेक्शन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण, फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा.

केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.