मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला कमी; आयुक्तांनी दिली दिलासादायक आकडेवारी


मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात रौद्र रुप धारण केलेले असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव आर्थिक राजधानी मुंबईत कमी होऊ लागला आहे. शहरात कोरोना चाचणीच्या पॉझिटिव्हिटीचा दर १० टक्क्यांहून खाली आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर २९ एप्रिल रोजी ९.९४ टक्के एवढा होता. मुंबईत गुरुवारी एकूण ४३ हजार ५२५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ३२८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जवळपास ४४ हजार चाचण्या केल्यानंतरही शहरातील कोरोनाबाधितांचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याचे इक्बालसिंह चहल म्हणाले.

पालिका आयुक्त मुंबई शहरात नव्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचं सांगत म्हणाले की, तब्बल ८५ टक्के रुग्ण लक्षणंविरहीत असल्यामुळे शहरात उपलब्ध असणाऱ्या बेड्सची संख्या वाढली असून ती आता ५ हजार ७२५ एवढी झाली आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शहरात कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्ही दर २०.२५ टक्के होता, तर ४ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांच्या तुलनेत उच्चांकी २७.९४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. हा दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे सध्यातरी दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाल्यानंतर मुंबईतही कोरोनाने धुमाकूळ घातला होता. रुग्णवाढीची संख्या प्रचंड असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला. परिणामी आरोग्य सुविधांअभावी अनेक रुग्णांचे हाल झाले. पण लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीनंतर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश येत असल्याचे पाहायला मिळत आहे.