क्रेडिट कार्ड वापरणारे हमखास या चुका करतात


मुंबई : देशातील क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये 2016 नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात ऑक्टोबर 2016 मध्ये 2.7 कोटी क्रेडिट कार्ड वापरकर्ते होते, तर ऑगस्ट 2018 मध्ये ती संख्या 4.1 पर्यंत वाढलेली होती. 2016-18 या दोन वर्षात यामुळे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे आता त्यांच्या चुकांमध्येही वाढ झाली असल्यामुळे काही फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत, तर क्रेडिट कार्ड बिल न भरल्यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागले जाते. आज क्रेडिट कार्डबद्दलच्या अशा चुकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्या तुम्ही कधीच करु नका.

तुम्हाला क्रेडिट कार्डची माहिती कधीही बँक आणि क्रेडिट कार्ड कंपनी विचारत नाही. तुम्हाला जर कुणी कार्डची माहिती विचारल्यास समजा, तो व्यक्ती तुमची फसवणूक करत आहे. तुम्ही पेट्रोल पंप किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कार्ड देताना सावध राहणे गरजेचे आहे. कधीही तुमच्या कार्डचा पिन आणि माहिती इतर कुणाला सांगू नये. तुमचे कार्ड कुणाला देऊ नये.

नेहमी असे ग्राहक क्रेडिट कार्ड कंपनींना आवडतात, वेळेवर जे बिल भरत नाहीत. अशा आपल्या ग्राहकांना बऱ्याचदा कंपनी ई मेल आणि एसएमएसने बिल भरण्याचे रिमाइंडर मेसेज पाठवते. अशा रिमाइंडरकडे दुर्लक्ष करु नका, बिल ठरलेल्या वेळेत नेहमी भरत जा. बिल भरले नाही, तर त्यावर वाढीव शुल्क आकारले जाते. वेळेवर पैसे भरले नाही, तर तुमचा क्रेडिट कार्ड स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री बिघडते. यामुळे भविष्यात इतर लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळणे कठीण होते.तुम्ही एखाद्या क्रेडिट कार्डचे पैसे कमीत कमी भरले, तर 2 ते 4 टक्क्यांचे व्याज उरलेल्या रकमेवर लावले जाते. 24 ते 48 टक्क्यांपर्यंत हा व्याज दर जातो. इतका व्याजदर क्रेडिट कार्डशिवाय इतर कोणत्याही कर्जाला नसतो. अशावेळी ईएमआय सुविधा सुरु करावी. 15 ते 18 टक्के व्याज ईएमआयवर वर्षाला द्यावे लागते.

क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे खूप महागात पडू शकते. क्रेडिट कार्डमधून काढलेल्या पैशांवर 2.5 टक्के चार्ज लागू शकतो. याशिवाय 2 ते 4 टक्के प्रत्येक महिन्याला व्याजही द्यावे लागते. आपत्कालीन परिस्थितीमध्येच तुम्ही पैसे काढा. पूर्णपणे क्रेडिट कार्डची मर्यादा वापरु नये, ती राखून ठेवावी. कारण, यामुळे क्रेडिट कार्डच्या स्कोअरवर नकारात्मक फरक पडतो. एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करणाऱ्या ग्राहकांना भविष्यात इतर लोन मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्याकडे नेहमी एक कार्ड ऐवजी दोन ते तीन कार्ड ठेवा. यामुळे मोठा खर्च व्यवस्थित वाटून घेता येतो.

तुमच्याकडून क्रेडिट कार्ड कंपनी कार्डचा वापर करुन घेण्यासाठी अनेकदा ऑफर देत असते. बऱ्याचदा रिवॉर्ड पॉइंट्सचे लालच कंपनी ग्राहकांना देते. पण, हे पॉइंट्स कमवण्यासाठी अधिक खर्च करु नये. गरजेप्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर करावा. प्रत्येक वर्षात किंवा दोन वर्षामध्ये रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करावा. बऱ्याचदा दोन कार्ड असताना आपण एक कार्ड बंद करतो. असे बिलकूल करु नये. यामुळे क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण (यूटिलायझेशन रेशिओ) बिघडते. एक कार्ड बंद केल्यामुळे तुमच्या वापरण्याच्या प्रमाणात वाढ होते. कारण एक कार्ड बंद केल्याने दोन्ही कार्डवरील वापर हा एकाच कार्डवर येतो आणि कार्डच्या वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याने स्कोअर बिघडतो. कार्डचा वापर करु नका, पण ते नेहमी अॅक्टिव्ह ठेवा.

Leave a Comment