पीपीई किट काढलेल्या डॉक्टरचा फोटो वेगाने व्हायरल

देशालाच नव्हे तर सर्व जगभराला झपाटलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी प्राणपणाने लढाई कशी सुरु आहे याचे बोलके दर्शन घडविणारा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. डॉक्टर सोहेल यांचा हा फोटो त्यांनी स्वतःच शेअर केला असून त्यात पीपीई किट काढल्यावर घामाने डबडलेले आणि थकलेले डॉक्टर सोहेल दिसत आहेत.

देशात करोनाने थैमान घालते आहे, त्यात औषधांची टंचाई, लसीची कमतरता, ऑक्सिजनची चणचण, रुग्णाच्या गर्दीने ओसंडून जात असलेली हॉस्पिटल्स, रोज लाखो लोकांना होत असलेले संक्रमण आणि हजारो मृत्यू असे निराशाजनक चित्र सध्या दिसत असले तरी डॉक्टर्स आणि अन्य मेडिकल स्टाफ रात्रंदिवस रुग्णांना सेवा देत आहे.

डॉ. सोहेल त्यांच्या फोटोखाली कॅप्शन लिहिताना म्हणतात,’ देशासाठी काही करू शकतोय याचा अभिमान वाटतोय.’ पुढच्या ट्विट मध्ये ते म्हणतात,’ सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक यांच्या तर्फे सांगतो, आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर राहून काम करतोय. करोना संसर्ग झालेल्या रूग्णापासून अगदी जवळ तर कधी गंभीर रुग्णापासून १ इंच अंतरावर राहून काम करत आहोत. तुम्ही सर्वानी लसीकरण करून घ्यायला हवे. करोना पासून बचावाचा तोच एक चांगला मार्ग आहे. सुरक्षित राहा.’

या फोटोवर प्रतिक्रियांचा पाउस पडला असून २८ एप्रिल रोजी हा फोटो शेअर केला गेला आहे. त्याला हजारो लाईक आले आहेत आणि युजर्सनी करोना वॉरीअर्स ना मनापासून सॅल्युट केला आहे.