चेटकी मुळे वाळूत रुतत चाललेले गाव अल मदाम

युएई मधील एक गाव अल मदाम हे आता साहसी पर्यटनाची आवड असल्याचे आकर्षण बनले आहे. मात्र युएई सरकार हे गाव पर्यटन नकाशावर आणण्यासाठी फारसे उत्सुक नाही असे दिसून येत आहे. दुबई पासून केवळ १ तासाच्या आणि शारजा पासून जवळ असलेल्या या गावाचे गुढ उलगडलेले नाही आणि त्यामुळे त्याचे आकर्षण वाढत चालले आहे.

गावात अगदी अगोदर आराखडा काढून बांधावी तशी घरे आहेत. एक मशीद आहे. १९७० पर्यंत या गावात वस्ती होती पण नंतर एका रात्रीत हे गाव सोडून गावकरी निघून गेले असे सांगतात. त्यांनी इतक्या घाईत गाव सोडले की घराचे दरवाजे सताड उघडे आहेत आणि घरातील फर्निचर वाळूत दाबले गेले आहे. घरे आजही चांगल्या स्थितीत आहेत. एका एकी गाव उजाड झाल्याने अनेक कथांना जन्म मिळाला आहे.

आसपासचे गावकरी सांगतात, या गावात एक जिन आल्याने गावकरी त्याच्या भीतीने गाव सोडून पळाले. कुणी सांगतात, येथे मांजरासारखे डोळे असणाऱ्या एका चेटकीने गावाचा ताबा घेतला आणि त्यामुळे तिला घाबरून गावकरी निघून गेले. पण खरी हकीकत सांगणारा अजून तरी कुणी सापडलेला नाही. कुणी सांगतात वाळूचे अतिभयानक वादळ झाल्याने लोकांनी सामान न घेताच संरक्षणासाठी दुसरीकडे धाव घेतली आणि त्यामुळे घरात, दारात, गावात सर्वत्र वाळूचे ढीग लागले आहेत.