आयफोन १३ प्रो चे डीटेल्स लिक

युजर्स डेटाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करणारी कंपनी अशी अॅपलची ख्याती आहे. मात्र कंपनी स्वतःच्या अपकमिंग मॉडेल्सचे डीटेल्स लिक होण्यापासून स्वतःला वाचवू शकलेली नाही हे स्पष्ट झाले आहे. येत्या सप्टेंबर मध्ये आयफोन सिरीज १३ लाँच केली जाणार आहे आणि त्याची तयारी जोरात सुरु आहे. अश्या वेळी  आयफोन १३ सिरीज मधील आयफोन १३ प्रोचे डीटेल्स लिक झाले आहेत.

आयफोन १३ सिरीज मध्ये आयफोन १३, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स अशी तीन मॉडेल्स येणार आहेत. लिक झालेल्या माहितीनुसार १३ प्रो छोट्या नॉचसह असेल. त्याला १२ एमपी प्रायमरी सेन्सरपेक्षा मोठा रिअर कॅमेरा सेन्सर दिला जात आहे. शिवाय पोट्रेट व्हिडीओ मोड दिला जाणार आहे.

आयफोन १२ पेक्षा अधिक चांगले अल्ट्रा वाईड लेन्स या फोनमध्ये दिले जाईल तसेच इन डीस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर , फेस आयडी लॉक अनलॉक फिचर दिले जाणार आहे. टिप्स्टरच्या माहितीनुसार या फोन साठी आयओएस १५ दिली जाईल. तसेच ऑलवेज ऑन डिस्प्ले असेल. म्हणजे हँडसेट लॉक झाला तरी घड्याळ आणि बॅटरी आयकॉन दिसत राहणार आहे. या फोनची सुरवातीची किंमत १,१९,००० असेल असेही समजते.