आंतरराज्य, स्थलांतरित आणि असंघटित कामगारांसाठी मुंबई शहर कामगार उपायुक्तांमार्फत विविध उपाययोजना


मुंबई : आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर कामगार विभागामार्फत चाइल्डलाईन या अशासकीय संस्था व पिरॉमिल ग्रुपच्या सहकार्यातून सहाय्यता कक्षामार्फत नास्ता पाकिटे व पाणी इत्यादी गरजेच्या वस्तुंचे स्थलांतरित कामगारांना वाटप करण्यात आले आहे.

मुंबई शहराच्या कामगार उप आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, अपर कामगार आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्हा कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत कामगारांना सहाय्य करण्याकरीता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकारी यांचे दूरध्वनी/मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आठवड्यातील 7 ही दिवस हे कक्ष कार्यान्वीत आहे. या कक्षामार्फत नोडल अधिकारी यांच्याकडील प्राप्त तक्रारी तसेच कार्यालयास प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात येते.

बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन व रात्रीचे भोजन देण्यात येत आहे. शासनाने 22 एप्रिल, 2021 रोजी नोंदित बांधकाम कामगारांकरीता रु.1500/- प्रत्येकी आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सी.एस.टी, बॉम्बे सेंट्रल, दादर, या प्रमुख रेल्वेस्थानकांवर अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांना स्थलांतरीत कामगारांची माहिती घेऊन त्यांना सहाय्यता करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याबाबतचे बॅनर रेल्वे स्थानकाचे दर्शनी भागात लावण्यात आलेले आहे.