पुढील ३ दिवस बंद राहणार मुंबईतील लसीकरण – अतिरिक्त आयुक्त


मुंबई – सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरणाची मोहिम सुरू असताना अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसी अपुऱ्या पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत लसीच्या डोसचा अपुरा साठा असल्यामुळे पुढचे किमान ३ दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भातील माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन आहे. तसेच, नवीन पुरवठ्याबाबत रविवारपर्यंत निश्चित माहिती मिळेल. त्यानुसार प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मुंबईकरांना त्याची माहिती दिली जाईल आणि सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल, असे देखील सुरेश काकाणी यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे आता पुढचे तीन दिवस मुंबईकरांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आमचा आजचा लसींचा साठा संपत आलेला आहे. लसीकरण मोहीम पुढील ३ दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की लसीकरण केंद्रांवर त्यांनी गर्दी करू नये. मुंबईतील सर्वच केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईसाठी ७६ हजार डोस मिळाले आहेत. त्यापैकी ५० हजार आज दुपारपर्यंत संपले आहेत. उरलेले दिवसभरात संपतील. त्यामुळे पुढील साठा मिळेपर्यंत लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. उद्या साठा मिळण्याची शक्यता कमी आहे. केंद्राकडून विशेष बाब म्हणून साठा उपलब्ध करून दिला, तरच लसीकरण करता येईल, असे आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, लसीकरणाविषयी नागरिकांना यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आवाहन केले आहे. आधी कोविन अॅपवर नागरिकांनी नोंदणी करावी किंवा संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि मगच दिलेल्या तारखेला केंद्रावर जाऊन लस घ्यावी. यामध्ये ज्यांनी नोंदणी केली आहे आणि ज्यांचा दुसरा डोस आहे, अशाच नागरिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.