अमेरिकेचे आपल्या नागरिकांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश


वॉशिंग्टन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसलेला असून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यातच भारताला ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे.

दरम्यान भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणेही कठीण झाले असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.

कोरोनाच्या संकटात आपल्या नागरिकांनी शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास अमेरिका सरकारने सांगितले आहे. अमेरिकेकडून यासंबंधी अॅडव्हायजरी रिलीज केली असून अमेरिकन नागरिकांनी भारतात जाऊ नये किंवा लवकरात लवकर भारत सोडावे, असे सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या १४ विमाने सुरु आहेत. याशिवाय युरोपमधून जोडली जाणारी सेवा आहे.