भाजप नेत्या पंकजा मुंडे कोरोनाबाधित


बीडः माजी महिला व बालविकास मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पंकजा मुंडे यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरु आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे. ६० हजारांच्या संख्येने राज्यात दररोज रुग्ण सापडत आहेत. आरोग्य यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच राज्यातील लोकप्रतिनिधींनाही आता कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. पंकजा मुंडे यांनीही एक ट्वीट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.


माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आधीच सावधगिरी बाळगून मी विलगीकरणात होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याचवेळी कदाचित मला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे.