ना प्रसिद्धी, ना गाजावाजा, पटनाईकांनी ८ राज्यांना दिला ऑक्सिजन

देशात करोना त्सुनामी आली असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत मात्र या काळात कोणताही गाजावाजा अथवा प्रसिद्धी न करता ओरिसा या छोट्या राज्याने देशातील करोनाचा प्रकोप सर्वाधिक असलेल्या आठ मोठ्या राज्यांना ऑक्सिजन पुरवून संजीवनी दिली आहे. या निमित्ताने ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधानांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

देशात जाणवत असलेल्या ऑक्सिजन टंचाई आणि करोनाचा वेगाने होत असलेला प्रसार या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी नवीन पटनायक यांनी ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी गेल्या पाच दिवसात ९० टँकर मधून १६७५.७ मेट्रिक टन ऑक्सिजन आंध्रप्रदेश, तामिळनाडू, हरियाना, महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, छतीसगढ़, उत्तर प्रदेशाला पुरविला आहे.

त्यासाठी पटनायक यांनी स्पेशल सेलची स्थापना करून राज्य एडीसी वाय. के. जेठवा यांच्यावर खास जबाबदारी सोपविली होती. जेठवा यांनी अन्कुल, ढेंकनाल, जाजपूर, राउरकेला स्टील प्रकल्पातून मेडिकल ऑक्सिजन लोडिंग आणि वाहतूक जबाबदारी सांभाळली. टँकर जलद गतीने पोहोचावेत म्हणून डेडीकेटेड कॉरीडॉर तयार करून चोवीस तासात ऑक्सिजनचा पुरवठा संबंधित राज्यांना केला गेला.

या मदतीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन पटनायक यांचे आभार मानले आहेत.