रशियाची स्पुतनिक पाच लस आज भारतात दाखल होणार

भारतात कोविड लसीची टंचाई असल्याने १ मे पासून १८ वयोगटापुढील नागरिकांचे लसीकरण कसे होऊ शकणार याची शंका व्यक्त केली जात असतानाच रशियाची स्पुतनिक पाच कोविड लस ही चिंता दूर करणार असल्याचे समजते. आज रात्री पर्यंत रशियातून दोन विमाने ही लस घेऊन भारतात पोहोचत आहेत. रॉयटरच्या बातमीनुसार मास्कोच्या गमालीया इन्स्टिट्यूट सह ही लस विकसित करणारे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड प्रमुख किरोल दिमित्रेव यांनी स्पुतनिक पाच ची पहिली बॅच १ मे रोजी भारतात उपलब्ध होत असल्याचे सांगितले आहे.

यामुळे देशात १८ + वयोगट लसीकरण मोहिमेस मोठा हातभार लागणार आहे. भारताने १३ एप्रिल रोजी या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. मॉडर्ना, फायझरच्या लसी ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला जात असताना रशियाची ही लस ९१.६ टक्के प्रभावी असल्याचे रिपोर्ट येत आहेत. या लसी मध्ये दोन वेगवेगळया व्हायरसचा वापर केला गेला असून ६० पेक्षा अधिक देशात या लसीला मंजुरी मिळाली आहे.

भारतात ही लस ७०० रुपयांपेक्षा कमी दरात मिळणार असल्याचे समजते. शिवाय ही लस २ ते ८ डिग्री तापमानात स्टोर करता येते. भारतात डॉ. रेड्डीजकडून ही लस विकसित केली जात असून येत्या काही महिन्यात भारतातील ६ कंपन्यांमध्ये ८५ कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. रशियातून पहिल्या बॅच मध्ये १२.५ कोटी डोस पाठविले जात असल्याचे समजते.