भारत चीन खडतर सीमेवर रस्ता उभारणी, जबाबदारी पेलणार महाराष्ट्राची कन्या वैशाली हिवासे

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे बीआरओ या भारताच्या सीमा भागात आणि आणि दुर्गम भागात रस्ते बांधणीचे काम करणाऱ्या संस्थेने भारत चीन सीमा भागातील अति खडतर अश्या ठिकाणी रस्त्याच्या आरसीसीचे काम महिला अधिकाऱ्यावर सोपविले आहे. बुधवारी या संदर्भात दिल्या गेलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या वर्धा येथील वैशाली हिवासे या अधिकारी महिलेवर हे आव्हानात्मक काम सोपविले गेले आहे. वैशाली या एमटेक आहेत शिवाय यांनी कारगील मध्ये एक कार्यकाल पूर्ण केला आहे.

नव्या जबाबदारी बद्दल बोलताना वैशाली म्हणाल्या, बीआरओने ही संधी देऊन महिला सशक्तीकरणाच्या नव्या युगाची सुरवात केली आहे. यामुळे महिला अधिकारी अधिक कठीण, अवघड जबाबदारी सांभाळू शकतील. बीआरओ ने उत्तर आणि उत्तर पूर्व भागावर एकाच वेळी लक्ष केंद्रित केले आहे. सीमा भागात रस्ते विकास आणि निर्माण काम २०१८ ते २०२३ या काळात पूर्ण केले जाणार आहे. या कालावधीत १४,२६९. ३१ किमी लांबीचे २७२ रस्ते आणि ४ पूल बांधले जाणार आहेत.