ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात तक्रार करणाऱ्या रुग्णालयांना उत्तर प्रदेशमधील योगी सरकार तंबी


लखनौ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची मागणी देशभरातील अनेक रुग्णालयांकडून होत आहे. त्यातच ऑक्सिजन कमी पडल्यास रुग्णालयांकडून राज्यांना आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिली जात आहे. असे असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात तक्रार करणाऱ्या रुग्णालयांना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मात्र तंबी दिली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असला तरी त्याचा गाजावाजा करु नका. प्रसारमाध्यमांसमोर गाजावाजा केल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा योगी सरकारने रुग्णालयांना दिला आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील प्रशासनिक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानिरीक्षक यांच्यासोबत एक आढावा बैठक घेतली. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ज्या रुग्णालयांमधून रुग्णांना सोडून दिले जात आहे किंवा ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली जातेय त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

आमच्याकडे ऑक्सिजन नाही, अशी नोटीस लावणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई केली पाहिजे आणि रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले पाहिजे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुद्दाम रुग्णालयांकडून गोंधळ निर्माण करणारी, रुग्णांना घाबरवून टाकणारी परिस्थिती निर्माण केली जात आहे का याची चौकशी केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

राज्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितले. प्रत्येक खासगी आणि सरकारी रुग्णलयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात राज्य सरकार काम करत आहे, पण ऑक्सिजनचा गैरवापर थांबवला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पण एकीकडे ऑक्सिजनची समस्या नसल्याचं सांगताना दुसरीकडे त्यासंदर्भातील आदेश देत एकापद्धतीने योगी यांनी ऑक्सिजन समस्येसंदर्भात अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त केल्याचे काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. १०० किंवा त्याहून अधिक बेड्स असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लॅण्ट असेल, असे सुनिश्चित करावे. यासंदर्भातील प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठवा, असे आदेश योगींनी अधिकाऱ्यांना दिल्याचे या बैठकीतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लखनौसोबतच राज्यातील इतर शहरांमधील रुग्णालयांनी मागील काही दिवसांपासून ऑक्सिजन तुटवड्याची तक्रार केली असून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना इतर ठिकाणी हलवावे, असे म्हटले होते. लखनौमधील एका खासगी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आदित्यनाथ यांनी स्वत: येऊन रुग्णालयांची परिस्थिती पहावी, असे म्हटले आहे.

प्रत्येक रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी तेथील ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट करावे. त्यानंतर आपण रुग्णालयांना आणि लोकांना अशा परिस्थितीत सोडल्याबद्दल त्यांचेच त्यांना वाईट वाटेल, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये जागा कमी पडत आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीच वाटत नाही. त्यांना फक्त रुग्णालयांनी त्यांचा अजेंडा राबवून खरी माहिती लपवून ठेवण्यात रस असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

सोमवारपासून स्थानिक पत्रकारांना ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातील माहिती लखीमपुर खेरी, फिरोजाबाद, बरेली, मेरठ जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमधील डॉक्टरांनी देण्यास सुरुवात केली. आनंद रुग्णालयातील डॉक्टर संजय जैन यांनी, आमच्या रुग्णालयातील २० रुग्णांना आम्ही आर्यव्रत रुग्णालयात हलवले, कारण आमच्याकडे ऑक्सिजनचा तुटवडा होता. आम्हाला दिवसाला ३०० ते ४०० सिलेंडर्स लागतात, पण १५० सिलेंडर्सच पुरवले जात असल्याची माहिती दिली. अशाच तक्रारी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील इतर रुग्णालयांमधील डॉक्टरांनाही केल्या आहेत.