इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांनी नरेंद्र मोदींना संबोधले कोरोना सुपर स्प्रेडर


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचे देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट देशामध्ये आली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी परवानगी दिल्यामुळे कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे मोदींना डॉ. नवज्योत यांनी सुपर स्प्रेडर म्हटल्याचे, द ट्रेब्युने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोनासंदर्भातील नियम पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोक काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. कोरोनासंदर्भातील सर्व नियम त्यांनी मोडल्याचे डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.

जानेवारी २०२० मध्ये देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याचे सांगत डॉ. नवज्योत यांनी त्यावेळीही मोदींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. नवज्योत यांनी, जानेवारी २०२० मध्ये देशातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर मोदींनी यासंदर्भातील उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतल्याचे म्हटले आहे.

आता कोरोनाच्या दुसरी लाट अद्याप सर्वोच्च स्तरावर (पीकवर) पोहचलेली नसतानाही देशातील आरोग्य सेवा डळमळत असल्याचे चित्र दिसत असतानाही पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काही निर्णय घेतल्याचे दिसून आले नाही, असेही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदींवर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही टीका केली असून देशातील सध्याची कोरोना परिस्थिती ही मोदींच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम असल्याचे अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी म्हटले आहे. देशातील अनेक ठिकाणी रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दगावत असल्याचं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्यासंदर्भातील होकार केंद्राने न दिल्याने प्रकल्प रडखले आहेत. या गोष्टींना मोदी सरकारने फार महत्व दिले नसल्याची टीका नवज्योत यांनी केली आहे.

अंत्यविधीसाठी देशातील अनेक शहरांमध्ये स्मशानभूमींबाहेर लागलेल्या रांगा या कोरोना परिस्थितीची दाहकता दर्शवणाऱ्या असल्याचेही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी आंदोलनासंदर्भातही योग्य ते निर्णय घेतले नाही. मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिले. प्रश्न सोडवण्यापेक्षा आंदोलन होऊ दिले आणि त्या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढला, असे डॉ. नवज्योत म्हणाले. बाबा राम देव यांच्या पतंजलीच्या औषधांना समर्थन देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरही डॉ. नवज्योत यांनी टीका केली.