ठाणे महानगरपालिका हद्दीत उद्या होणार नाही लसीकरण – महापौर नरेश म्हस्के


ठाणे – १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी देशभरात आजपासून नोंदणी सुरू झाली. या नागरिकांचे येत्या १ मे पासून लसीकरण केले जाणार आहे. पण १ मेपासून महाराष्ट्रात लसीकरण सुरू होणार नसून लसीच्या डोसचा अपुरा साठा यासाठी कारणीभूत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

याच दरम्यान ठाण्यात देखील लसीच्या डोसचा तुटवडा आता जाणवू लागला असून या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच गुरुवारी २९ एप्रिल रोजी ठाणे महानगर पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील, असे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारची लसीकरणाची घोषणा आणि स्थानिक पातळीवर लसीच्या डोसची उपलब्धता यांचा ताळमेळ बिघडतानाचे चित्र दिसू लागले आहे.


दरम्यान, हे ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी खोचक टीका देखील केली आहे. राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचे डोस केंद्र सरकारकडून मिळत नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अनेकदा ही गोष्ट बोलून दाखवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

लसीचा साठा संपल्यामुळे ठाण्यात उद्या महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील. आमची तयारी पूर्ण आहे. फक्त आता तुम्ही कमी पडू नका, असे या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केले आहे.