पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यास नरेंद्र मोदींची मंजुरी


नवी दिल्ली – पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रवरुप ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ करण्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, त्या राज्यांना लवकरात लवकर हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यात यावे, असे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत. पीएम केअर फंडातून यापूर्वी ७१३ पीएसए ऑक्सिजन प्लांट्स मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी ५०० प्लांट्सना मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली रुग्णालये तसेच दुसऱ्या श्रेणीच्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये हे पीएसए ऑक्सिजन प्लांट्स द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा करतील. हे प्लांट्स संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांनी स्थानिक उत्पादकांसाठी बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन बसवता येणार आहेत. यामुळे ऑक्सिजन प्लांट्सपासून रुग्णालयांपर्यंत ऑक्सिजन पुरवणे सोपे होणार आहे.