काल दिवसभरात 2,61,162 रुग्ण झाले कोरोनामुक्त


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 3,60,960 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3293 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, काल दिवसभरात 2,61,162 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तत्पूर्वी सोमवारी देशात 3,23,023 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

देशात गेल्या तीन दिवसांत 1 मिलियनहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 25 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत अनुक्रमे 3.52 लाख, 3.23 लाख, 3.60 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. हा आकडा जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख कायम आहे. मंगळवारी 66 हजार 358 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात काल 895 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचे समोर येऊ लागले आहे.

राज्यात मंगळवारी 67 हजार 752 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 69 हजार 548 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 895 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.05 टक्के एवढा आहे.

तर गेल्या 24 तासात मुंबईत 4014 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. काल 8240 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 55 हजार 101 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 87 टक्के आहे. सध्या 66 हजार 045 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 68 दिवस आहे. कोविड रुग्णांचा दर 1.01 टक्के आहे.