भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर WHO ने व्यक्त केली चिंता


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरशः थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आता दररोज साडेतीन लाखांच्या वर जात आहे. त्याचबरोबर भारतातील मृत्यूच्या प्रमाणातही जागतिक तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली भारतातील परिस्थिती ही अत्यंत वाईट असून हृदय पिळवटून टाकणारी असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटाचा जगातील अनेक देश मुकाबला करत आहेत, पण भारतातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले की, भारतातील कोरोना स्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत पुरवण्याचे काम सुरू आहे.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासोबतच पीपीई किट्स आणि इतर साहित्यांची मदत भारताला करण्यात येत आहे. भारतातील कोरोनाच्या संकटाला नियंत्रित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दोन हजारहून जास्त कर्मचारी भारतात काम करत असल्याचे, तसेच भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमात मदत करत असल्याचे टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले. तसेच जगभरातील इतरही अनेक देशांनी भारताला मदत करण्यास सुरुवात केली आहे.