शायरीच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी मानले आरोग्य सेवकांचे आभार


नवी दिल्ली – आपल्या ट्विट्समुळे महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. ते कधी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारणा करतात, तर कधी त्यांचेच आभार देखील मानतात. आनंद महिंद्रा उद्योग विश्वासोबतच समाजात घडणाऱ्या घडामोडींवर कायम आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून व्यक्त होत असताता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात सध्या थैमान घातलेले असताना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी या सर्वांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळाप्रमाणेच आजही आपल्या जिवावर उदार होऊन रुग्णसेवा अविरत सुरू ठेवली आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यावर आता शायरीच्या माध्यमातून ट्विट करत या आरोग्य क्षेत्रातील योद्ध्यांना सलाम केला आहे.


आनंद महिंद्रांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मंगळवारी दुपारी हे ट्वीट केले आहे. त्यांनी यामध्ये एक शेर देशातील लाखो आरोग्य सेवकांसाठी लिहिला आहे. वो कोई और चिराग होते हैं, जो हवाओं से बुझ जाते हैं…. हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…, असे ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. त्याचबरोबर अथकपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या आपल्या फ्रंटलाईन हिरोंचे आभार आणि कौतुक!, असे देखील त्यांनी म्हटले आहे.