1 मे रोजी भारतात दाखल होणार रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी लस हे सर्वात प्रभावशाली हत्यार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा वापर करण्यात येत आहेत. त्यात आता आणखी एका लसीची भर पडणार असून 1 मे पर्यंत रशियाची Sputnik V या लसीची पहिली खेप भारतात दाखल होणार आहे.

या बाबतची माहिती रशियाच्या RDIF अर्थाच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे अध्यक्ष किरिल दमित्रिव यांनी दिली आहे. भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेला रशियाच्या Sputnik V या लसीमुळे गती मिळणार आहे. नेमके किती प्रमाणात डोस येणार याची माहिती देण्यात आली नसली तरी लसीचे किमान पाच कोटी डोस भारतामध्ये पाठवण्याचे नियोजन रशियाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या लसी सुरुवातीला भारत आयात करेल आणि नंतर या लसीच्या निर्मितीला देशातच सुरूवात केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

रशियाची कोरोना लस Sputnik V कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने दावा केला आहे की Sputnik V लस ही 91.6 टक्के प्रभावी आहे. कोव्हिशिल्ड ही 80 टक्के तर कोव्हॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या दोन लसींचा वापर भारतात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये केला जात आहे. या दोन लसींचे महिन्याला सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येत आहे. Sputnik V लस आल्यानंतर या लसींवरची निर्भरता कमी होईल असेही सांगण्यात येत आहे.