‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवणारे व्यासपीठ – डॉ. नीलम गोऱ्हे


मुंबई : अबोल राहून समाजासाठी काम करणाऱ्या न लिहित्या, बोलत्या माणसांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करत ‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवण्याचे व्यासपीठ बनले आहे, अशा शब्दात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.

नवी उमेद या व्यासपीठाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ‘नवी उमेदची पाच वर्षे’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमावरुन करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी युनिसेफच्या महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, नवी उमेदच्या श्रीमती मेधा कुलकर्णी, वर्षा देशपांडे आदी उपस्थित होत्या.

सामाजिक चळवळीमध्ये सातत्य ठेवणे ही खूप अवघड बाब असते. सध्या विशेषत: कोरोनाच्या कारणामुळे समाजामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. अशा वातावरणात उपेक्षित अशा सामाजिक प्रश्नांना एक व्यासपीठ मिळवून देणे, प्रतिष्ठा मिळवून देण्यासह जिल्हा, गाव पातळीवर ‘नवी उमेद’ पोहोचत आहे याचा आनंद वाटतो.

स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या कामाचा तसेच विधीमंडळात उपस्थित केलेल्या महिलांच्या प्रश्नांबाबतच्या उल्लेख करुन महिलांचे प्रश्न समाजापुढे आणण्यासाठी केलेल्या चळवळींच्या व कामांच्या आठवणी यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितल्या. काही वेळा आपल्या समस्यांना कमी अथवा महत्त्वच न देण्याचा प्रयत्न समाजातील काही प्रभावशाली घटकांकडून होतो. त्यासाठी सोयिस्कर मौन, ठरवून दुर्लक्ष करणे, पिडीतांचा वा आवाज उठवणाऱ्यांचा उपहास करणे, केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणे, अशा चुकीच्या बाबी केल्या जातात. सामाजिक काम करताना अशा बाबींना महत्त्व न देता सकारात्मकपणे आपले काम चालू ठेवले पाहिजे.

कोरोनाचा सध्या कठीण कालखंड सुरू असला तरी समाजात सकारात्मक मनोवृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्याही यशकथा (स्टोरीज) माध्यमांनी दाखवायला हव्यात, असेही मत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले.

श्रीमती राजेश्वरी चंद्रशेखर यांनी माहिती दिली की, कोविड काळात सर्वाधिक प्रभावित झालेल्या बालकांच्या अधिकारांसाठी युनिसेफने शासन तसेच विविध संस्थांसोबत काम करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यासाठी माहिती व जनसंपर्क कार्यालयाची देखील मोलाची मदत झाल्याचे त्या म्हणाल्या. शहरे तसेच गावांमध्ये लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधत आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

‘नवी उमेद’च्या श्रीमती मेधा कुलकर्णी प्रास्ताविक करताना म्हणाल्या की, समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात नकारात्मकता पसरवण्यात येत असताना लोकांना चांगले काम करत असलेल्या व्यक्तींचा, त्यांच्या कार्याचा परिचय करुन देत सकारात्मकता पसरवण्याच्या उद्देशाने आम्ही फेसबुक, यूट्यूब आदी समाजमाध्यमांवर अशा यथकथा शेअर करतो. नवी उमेदशी जोडलेले विविध जिल्ह्यातील लेखक, पत्रकार तसेच विविध क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत परंतु, दुर्लक्षित व्यक्तींकडून त्यांच्या कार्याविषयी लिहून घेण्याचे काम आम्ही करतो. त्याला मोठ्या प्रमाणात वाचक, प्रेक्षकवर्ग असून या यशकथांतून चांगल्या कामाची प्रेरणाही घेतली जाते. तसेच नवीन कामेही उभी राहतात, हेच नवी उमेदचे यश आहे, असे श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या.

राज्यातील विविध जिल्ह्यातून ‘नवी उमेद’सोबत सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, निसर्ग आदी क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्ती व त्यांच्या सकारात्मक यशकथा लिहून पाठवणारे लेखक यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. त्यापैकी काहींनी प्रातिनिधीक स्वरुपात आपले अनुभव मांडले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धारावी येथील डॉ. कैलास गौड, ब्लॉगर सायली राजाध्यक्ष, पत्रकार अलका धूपकर आदी उपस्थित होते. प्रांरभी संस्थेच्या कामाची चित्रफीत दाखवण्यात आली.