जो बायडन यांची दूरध्वनीवरुन कोरोना सद्यपरिस्थिबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा


नवी दिल्ली : सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये दूरध्वनीवरून अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या असणारे कोरोना संकट आणि सध्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या मार्गांवर यावेळी चर्चा झाली. ही चर्चा जवळपास अर्धा तास झाली. यामध्ये कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीसाठीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही भारत आग्रही दिसला.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी भारतात सुरु असणाऱ्या प्रयत्नांवरही बायडन आणि मोदी यांच्या झालेल्या या चर्चेमध्ये चर्चा झाली. यामध्ये लसीकरण, औषधे आणि आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली जाण्याचा मुद्दाही प्रकाशझोतात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अमेरिकेकडून देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

व्हाईट हाऊसकडून सदर चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकातून अमेरिका भारतातील कोरोना प्रभावित रुग्णांच्यासोबत खंबीरपणे उभी असल्याचे सांगण्यात आले. संकटकाळात मदत म्हणून अमेरिकेकडून भारताला ऑक्सिजन उपकरणे, लसीसाठी लागणारी सामग्री आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित केला जात आहे.