निवडणूक आयोगाची 5 राज्यांतील निकालानंतर कोणत्याही जल्लोषावर बंदी


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. आयोगाकडून लवकरच यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना जारी करण्यात येणार आहेत. दरम्यान, पाच राज्यांतील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधील निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांचे निकालही याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असताना काही राज्यांत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा, रॅली आणि रोड शो पार पडत होते. देशभरातून यावरुन निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागले जात होते. त्यातच काल मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार धरले होते. त्याचबरोबर सरन्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी सांगितले होते की, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा खटला चालवला गेला पाहिजे.