पॅट कमिन्सनंतर आणखी एका ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाजाची भारताला ४२ लाखांची मदत


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती अत्यंत भयंकर होत चालली आहे. दरम्यान या संकटावर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने ३७ लाखांची मदत केली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने मदतीचा हात पुढे केला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लीने सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती कमिन्सने त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. लीने या आवाहनानंतर भारताला मदत केली आहे.

ब्रेट लीने आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करताना लिहिले, की माझ्यासाठी भारत नेहमीच दुसऱ्या घरासारखा आहे. भारताचे माझ्या हृदयात माझी व्यावसायिक कारकीर्द आणि निवृत्तीनंतरही लोकांकडून मला मिळालेल्या प्रेमामुळे एक विशेष स्थान आहे. या साथीच्या आजारात लोक ज्या प्रकारे संघर्ष करत आहेत, हे पाहून मला फार वाईट वाटले. पण, ज्या स्थानी मी आहे त्याचा मला आनंद आहे. कारण मी काहीतरी करू शकतो.


मला क्रिप्टो रिलीफला एक बीटीसी (सुमारे ४२ लाख) रुपये देणगी द्यायची आहे, ज्यामुळे देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यात मदत होईल. ही एकत्र येण्याची वेळ आहे. आपण आपल्याला जमेल तितक्या गरजूंना मदत करू शकतो. या कठीण काळात काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो.

मी सर्व लोकांना विनंती करतो, की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. घरात राहावे, हात चांगले धुवावेत आणि जेव्हा अतिमहत्त्वाचे काम असेल तेव्हाच बाहेर पडावे. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे अनुसरण करा. पॅट कमिन्स, तू काल चांगली गोष्ट केली, असेही लीने या पोस्टमध्ये सांगितले.