Google, Microsoft नंतर आता कोरोना संकटात भारताला मदत करणार Apple


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील रुग्णांची आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचवेळी ऑक्सिजन, रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. भारताला ऑक्सिजन तयार करण्यासाठीचा कच्चा माल आणि इतर वैद्यकीय सामग्री अशावेळी अमेरिकेसह इतर देश पुरवत आहेत.

दुसरीकडे आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. भारतातील कॉर्पोरेट्सपैकी टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स यांसारख्या कंपन्यांनीही सरकारला आणि प्रत्यक्ष जनतेला वेगवेगळ्या रूपांत मदत सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी गुगल आयटी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कोरोना कार्यासाठी मदत निधी म्हणून 135 कोटी रुपये मदत भारताला देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनीही मायक्रोसॉफ्ट कंपनी पले स्रोत भारतातील वैद्यकीय मदत कार्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर केले.

त्यानंतर ॲपल या अमेरिकी स्मार्टफोन उत्पादक कंपनीचे सीईओ टीम कूक यांनीही आज भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील कोरोना योद्ध्यांसाठी आर्थिक मदत करण्याचा कंपनी विचार करत असल्याचे सांगितले आहे. पण कूक यांनी कंपनी किती रक्कम देणार आहे हे मात्र जाहीर केलेले नाही.

आपल्या ट्विटमध्ये ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे भारतात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत जे कोरोना महामारीविरुद्ध लढत आहेत,ते कोरोना योद्धे, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण आणि आमच्या कंपनीतील भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही वैचारिकदृष्ट्या ठामपणे उभे आहोत. भारतातील मदत कार्यासाठी लवकरच ॲपल आर्थिक मदत देईल.

प्राणाची बाजी लावून भारतातील हेल्थकेअर वर्कर्स, डॉक्टर हे कोरोनाविरुद्ध लढत असून त्यांना साधने कमी पडत आहेत. ऑक्सिजन सिलेंडर, मेडिकल इक्विपमेंट्स यांची टंचाई जाणवत आहे. ही परिस्थिती पाहून इतर अमेरिकी कंपन्यांनी मदत जाहीर केल्यावर ॲपलनेही मदत जाहीर केली.