प्रत्यक्षात नाही पण अस्थीरुपाने चंद्रावर आहे हा एकमेव वैज्ञानिक

प्रत्यक्षात चंद्रावर जायचे स्वप्न अपुरे राहिले तरी मृत्युनंतर हे स्वप्न पूर्ण होण्याचे भाग्य लाभलेला एकमेव वैज्ञानिक आहे युजीन मार्ले शुमेकर. जगातील हा असा एकमेव वैज्ञानिक आहे ज्याच्या अस्थी चंद्रावर दफन केल्या गेल्या आहेत. अमेरिकेत २८ फेब्रुवारी १९२८ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. विसाव्या शतकातील महान वैज्ञानिक अशी त्यांची ओळख असून १९९२ मध्ये अमेरिकेत तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पदक देऊन त्यांचा गौरव केला होता.

विशेष म्हणजे शुमेकर यांनी अनेक अंतराळ वीरांना प्रशिक्षण दिले होते. अंतराळाच्या हिशोबाने स्वतः मध्ये कसे आणि काय बदल करावे लागतील यांचे हे प्रशिक्षण होते. अमेरिकेच्या खगोल भूविज्ञान अनुसंधान केंद्राचे ते पहिले संचालक होते. युटा आणि कोलोराडो येथे युरेनियमचे साठे शोधण्यात त्यांनी यश मिळविले होते. ज्वालामुखी संदर्भात त्यांचा मोठा अभ्यास होताच पण हजारो वर्षापूर्वी एका उल्कापिंडाच्या टकरीमुळे डायनासोर नाहीसे झाले, तो उल्कापिंड नक्की कुठे धडकला होता याचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये शुमेकर यांचा समावेश होता.

शुमेकर यांचा १८ जुलै ९७ मध्ये कार अपघातात मृत्यू झाला. त्यांची पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाली होती. आज त्या ९० वर्षाच्या आहेत आणि त्या स्वतः सुद्धा खगोल वैज्ञानिक आहेत. शुमेकर यांचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न होते पण त्यांच्या ह्यातीत ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे नासा ने १९९७ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर दोन वर्षांनी म्हणजे १९९९ मध्ये त्यांच्या अस्थी चंद्रावर दफन केल्या असे समजते.