रोज शेकडो रुग्ण मरताहेत, तरी आयपीएलवर इतका खर्च?- अँड्र्यू टायला पडला प्रश्न

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला अँड्र्यू टाय भारतातील करोना परिस्थिती पाहिल्यावर मायदेशी परतला आहे मात्र त्याने जाताना एका प्रश्नाला तोंड फोडले आहे. टाय म्हणतो, देशात इतकी मोठी आरोग्य समस्या आहे, हॉस्पिटल मध्ये रुग्णाला बेड मिळत नाही आणि रोज शेकडो लोक करोनाचे बळी ठरत असताना आयपीएल मध्ये फ्रांचाईजी कंपन्या आणि सरकार पाण्यासारखा पैसा खर्च कसे करते आहे याचे नवल वाटते.

टाय पुढे म्हणतो,’ या लीग मुळे करोना पीडितांचा तणाव कमी होत असेल, त्यांना रोगाशी लढण्यासाठी उमेद मिळत असेल तरी ही स्पर्धा सुरु ठेवली पाहिजे पण भारतीय दृष्टीकोनातून विचार केला तर देशाच्या संकट काळात फ्रान्चाईजी कंपन्या इतका अमाप खर्च कश्या काय करू शकतात? क्रिकेट डॉट कॉम डॉट एव्ही च्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे. टाय म्हणतो, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असेलही. त्यामुळे मला दुसऱ्याच्या विचाराचा मान ठेवणे आवडेल. आयपीएल मध्ये खेळाडू सुरक्षित आहेत, पण कधी पर्यंत असा सवालही त्याने केला आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या प्रवाशांना ऑस्ट्रेलिया प्रवेशावर बंदी लागू केल्याची घोषणा केल्यावर टाय त्यालाही कदाचित मायदेशात परत जाता येणार नाही या भीतीने आयपीएल मध्येच सोडून मायदेशी परतला आहे. या स्पर्धेत तो एकही सामना खेळलेला नाही. त्याला १ कोटी रुपयात राजस्थान रॉयलने खरेदी केले  होते.