अणुवैज्ञानिक होमी भाभांची भूमिका साकारणार सैफ अली खान

भारताच्या जगप्रसिद्ध वैज्ञानिकांतील एक अणुवैज्ञानिक होमी जहांगीर भाभा यांच्या रहस्यमय मृत्यूवर आधारित बायोग्राफी चित्रपट बनविला जात असून त्यात होमी भाभा यांची भूमिका सैफ अली खान साकारणार असल्याचे समजते. रिलायंस एंटरटेनमेंट प्रॉडक्शन तर्फे हा चित्रपट बनविला जात असून त्याचे नाव ‘असॅसिनेशन ऑफ होमी भाभा’ असे आहे. विक्रमजीत सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

होमी जहांगीर भाभा हे देशाचे अतिशय प्रतिष्ठित अणुवैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध होते. १९६० च्या काळात भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. मात्र यावेळी भारत अणुबॉम्ब बनविण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता त्यामुळे भाभा यांचा अपघात म्हणजे अमेरिकेच्या सीआयने केलेली हत्या होती असे मानले जाते. भाभा यांच्या मृत्यूचे गुढ आजही कायम आहे.

सैफ अली खान गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. लाल कप्तान, तानाजी, वेब सिरीज तांडव मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. भूत पोलीस, आदिपुरुष व विक्रम वेताळ रिमेक मध्ये त्याचे दर्शन होणार आहे. भाभा यांच्यावरील चित्रपटाचे शुटींग पुढील वर्षाच्या सुरवातीला होणार असून त्याचे शुटींग भारत आणि बैरुत येथे केले जाणार आहे.