आयआयटीच्या वैज्ञानिकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे वर्तवली धक्कादायक शक्यता


नवी दिल्ली – गणितीय मॉडेलच्या आधारे भारतीय औद्योगिक संस्थेच्या (IIT) वैज्ञानिकांनी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या १४ ते १८ मे दरम्यान ३८-४८ लाखांपर्यंत पोहचू शकते असा अंदाज वर्तवला आहे. कोरोना प्रादुर्भावाचे ४ ते ८ मे दरम्यान दिवसागणिक साडेचार लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सोमवारी भारतात ३ लाख ५२ हजार ९९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना महामारीमुळे देशात २ हजार ८१२ लोकांना आपला जीव गमावला आहे. सध्या देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ पर्यंत पोहचली आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी सूत्र नावाचे मॉडेलचा वापर करत मे च्या पंधरवड्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत १० लाखांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. नव्या अंदाजानुसार या आकडेवारीत सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात ११ ते १५ मे मध्ये कोरोना कहर वाढू शकतो, असे सांगितले जात होते. पण मे च्या अखेरपर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होईल, असेही सांगण्यात आले आहे.

वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या महिन्याच्या सुरुवातीला देशात १५ एप्रिलच्या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या टॉपवर असेल सांगितले होते. पण हे भाकित खोटे ठरले. आयआयटी कानपूरमध्ये कॉम्प्युटर आणि विज्ञान अभियांत्रिकीचे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी सांगितले की, नव्या अंदाजानुसार मे महिन्यात रुग्णसंख्या वाढू शकते. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १४-१८ मे दरम्यान शिखर गाठणार आहे. दिवसांला साडेतीन लाखापासून साडेचार लाखापर्यंत नवीन रुग्ण आढळतील.