देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहीजे मोफत लस; विषय संपला


नवी दिल्ली – संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. देशातील अनेक राज्यांमधील रुग्णालयात बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर कोरोना लसींच्या किंमतींवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाची लस मोफत मिळाली पाहीजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.


चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. विषय संपला… भाजपाच्या सिस्टमचा भारताला विक्टिम बनवू नका, असे टीकास्त्र त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सोडले आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वीही केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सिस्टम फेल झाल्याप्रकरणी जनहिताची चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

२० एप्रिलला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत दिली होती. सौम्य लक्षणे आढळल्यानंतर चाचणी केली असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी कोरोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.