मोफत लसीकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर बाळासाहेब थोरांताची टीका


मुंबई – १ मेपासून देशभरात १८ वर्षांच्या पुढील सर्वांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यादरम्यान मोफत लसीकरण केले जाईल, असे अनेक राज्यांनी जाहीर केले असून याबाबत अद्याप महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला नाही. राज्य पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली. दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील यासंदर्भात ट्विट केले होते. पण त्यांनी हे ट्विट नंतर डिलीट केले. दरम्यान यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी जाहीर केली आहे.

आमची मोफत लसीकरणावर भूमिका स्पष्ट आहे. तसे सोनिया गांधी यांनी सांगितले असून लस मोफत दिली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला असून मान्य होईल, अशी आशा आहे. यावर मुख्यमंत्री विचार करत असताना श्रेय घेण्यासाठी कोणी जाहीर करते हे आम्हाला अजिबात पटलेले नाही, काँग्रेस म्हणून आमची नाराजी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणे आणि त्यासाठी जास्त केंद्रे उभारणे यासंबंधी धोरण आखावेच लागले. ४५ च्या पुढील नागरिकांच्या लसीकरणावेळी गर्दी होत असताना १८ च्या पुढील सर्वांना लस देताना गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गोंधळ होऊन कोरोनाचा प्रसार वाढेल. लस उपलब्ध करून देणे केंद्राची जबाबदारी असून दोन दिवसात धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.