जगातील सर्वात मोठ्या क्रुझचे पहिले प्रवासी बनण्याची संधी

रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलने त्यांच्या जगातील सर्वात मोठ्या क्रुझ ‘ वंडर ऑफ द सी’ च्या पहिल्या प्रवासाच्या बुकिंगची सुरवात केली असून मार्च २०२२ मध्ये हे जहाज त्याच्या पहिल्या सफरीवर रवाना होणार आहे. त्याची पहिली यात्रा शांघाई पासून जपान अशी आहे. वास्तविक हे क्रुझ अगोदरच प्रवासासाठी तयार होणार होते पण करोना मुळे त्याच्या प्रवासाची वेळ लांबली असे समजते. कंपनीने या क्रुझचे पहिले फोटो शेअर केले आहेत.

या क्रुझवर २ हजाराहून अधिक लग्झरी स्यूट आहेत आणि ६९८८ प्रवासी यातून एकावेळी प्रवास करू शकणार आहेत. एका व्यक्ती साठी शांघाई ते जपान प्रवासाचा ९ रात्री आणि ८ दिवसाचा खर्च दीड ते साडेतीन लाख रुपये येणार आहे. चार लोकांच्या फॅमिली स्यूटसाठी २७.५ लाख रुपये मोजावे लागतील. ओपन एअर अॅक्वा थियेटर, दोन हजाराहून अधिक झाडे असलेले सेंट्रल पार्क असलेले हे क्रुझ दहा मजली आहे. त्यात १८ डेक, २८६७ अलीश्यान स्यूट, पूल, स्पोर्ट्स झोन, जिम, बास्केट बॉल आणि व्हॉलीबॉल कोर्ट, मिनी गोल्फ कोर्स अश्या अनेक सुविधा आहेत. या क्रुझची लांबी ११८८ फूट, रुंदी २१० फुट आणि वजन २.३७ लाख टन आहे.

मार्च २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या काळात हे जहाज विविध सफरी करणार आहे. त्यात पहिल्या जपान सफरी मध्ये टोक्यो, फुजी, काआमोटो, कागोशिना, इशिगाकी, मिजाजाकी पोर्ट यां स्थळांचा समावेश आहे. त्यानंतर द. कोरिया, व्हिएतनाम येथील सफरी आहेत असे समजते.