ऑपरेशन ‘ऑक्सिजन मैत्री’ सुरु

भारतातील अनेक राज्यात कोविड संक्रमितांची संख्या वेगाने वाढत असल्याने निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या अभूतपूर्व तुटवड्यावर मात करण्यासाठी केंद्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. अनेक देशांनी भारताला मदतीचा हात देऊ केला असून ऑपरेशन ‘ऑक्सिजन मैत्री’ ची सुरवात झाली आहे. अनेक देशांतून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी ऑक्सिजन टँक्स आणले आहेत. दरम्यान रविवारी सौदी अरेबियाने दमाम बंदरातून ४ क्रायोजेनिक टँकर्स भारताच्या मुंद्रा पोर्ट कडे रवाना केले आहेत. यातून ८० टन लिक्विड ऑक्सिजन भारताला पाठविला गेला आहे. अडाणी समूहाच्या देखरेखीखाली हा जथा भारतात दाखल होत आहे.

दुसरीकडे रविवारीच ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी उपयोगी पाईपची खेप हाजिरा पोर्टवरून एमयु हाय ८६ जहाज कांडला पोर्टसाठी रवाना झाले होते. ब्रिटनने भारतासाठी मदतीचा हात पुढे करून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेट सह ६०० उपकरणे रविवारी पाठविली असून मंगळवारी ती दिल्लीत पोहोचणार आहेत. टाटा आणि भारत सरकारच्या सहाय्याने चार ऑक्सिजन टँकर सिंगापूर येथून एअर लिफ्ट करून आणले गेले आहेत.