म्हणून आयात केले जात आहेत क्रायोजेनिक टँक्स  

देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण झाल्याने टाटा समूहाने २४ क्रायोजेनिक टँक आयात केल्याची बातमी नुकतीच आली आणि त्यातील चार टँक भारतीय हवाई दलाने सिंगापूर येथून आणलेही आहेत. पण अनेकांना क्रायोजेनिक टँक म्हणजे नक्की काय आणि ते आयात का करावे लागले याची माहिती नसते. ते समजून घेणे योग्य आहे.

जर्मनीच्या लिंडे भारतीय समूहाने टाटा आणि भारत सरकारला साथ देऊन या टँक मधून लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. क्रायोजेनिक टँक हे खास प्रकारचे टँकर असतात. यातून प्रचंड थंड अशी लिक्विड ठेवली जातात आणि त्यांची वाहतूक केली जाते. लिक्विड ऑक्सिजन हे असेच प्रचंड थंड लिक्विड आहे. त्याचा उत्कलन बिंदू म्हणजे उकळी फुटण्याचे तापमान उणे १८५ अंश इतके असते. ज्या द्रवाचा उत्कलन बिंदू उणे ९० पेक्षा जास्त आहे असे सर्व द्रव या खास प्रकारे बांधल्या गेलेल्या टँक मधून नेली आणली जातात.

हे टँक बांधताना त्याची दोन आवरणे असतात. एक आतल्या बाजूला आणि एक बाहेरच्या बाजूला. या दोन्हीच्या मधली हवा काढून घेतली जाते आणि तेथे थर्मास प्रमाणे निर्वात पोकळी तयार केली जाते. यामुळे आतील द्रवावर बाहेरच्या गरम हवेचा परिमाण होत नाही. अतिज्वलनशील द्रवाची वाहतूक करताना असे टँक फार महत्वाचे असतात.

आता प्रश्न राहतो, आपल्याला या टँकची आयात का करावी लागली? त्याचे उत्तर असे की जानेवारी फेब्रुवारी मध्ये करोनाची तीव्रता कमी झाली होती त्यामुळे ऑक्सिजनची मागणी कमी होती. पण अचानक करोना प्रसार वेगाने झाल्याने ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. क्रायोजेनिक टँकचे उत्पादन त्वरित वाढविणे किंवा कमी वेळात हे टँक तयार करणे शक्य नसते. मुळात अश्या टँकचे उत्पादन कमीच असते. त्यामुळे मागणी वाढली म्हणून तातडीने हे टँक उत्पादित करता येत नसल्याने त्यांची आयात करावी लागते आहे.