प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांचे निधन

देश विदेशात आपल्या खास ख्याल गायकीने प्रसिद्ध झालेले राजन साजन मिश्रा या बंधूपैकी एक, पद्मभूषण राजन मिश्रा यांचे रविवारी दिल्लीत रुग्णालयात निधन झाले. त्यांना हृदयाचा आणि किडनीचा त्रास होत होता त्यातच त्यांची करोना टेस्ट पोझिटिव्ह आली होती. हिंदुस्थानी संगीताच्या रसिक प्रेक्षकात आदराचे आणि कौतुकाचे स्थान असलेल्या राजन साजन मिश्रा या भावंडांची जोडी या निधनामुळे तुटली गेली आहे.

जगभरातून पंडित राजन मिश्रा यांना श्रद्धांजली वाहिली जात असून पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे, ‘बनारस घराण्याशी जोडले गेलेले पंडित मिश्रा यांचे निधन म्हणजे कला आणि संगीत जगताचे मोठे नुकसान आहे. माझ्या भावना त्यांच्या कुटुंब आणि समर्थकांना व्यक्त करतो आहे.’

मिळालेल्या माहितीनुसार गेले चार दिवस मिश्रा यांना तब्येत बरी नसल्याने दिल्लीच्या स्टीफन रुग्णालयात दाखल केले गेले होते. तेथे त्यांची करोना टेस्ट पोझिटिव्ह आल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविले गेले. किडनीचा त्रास होऊ लागल्याने डायलिसीस केले गेले पण मध्येच त्यांना हृदय झटका आला. थोड्या वेळाने दुसरा झटका आला तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची निकड होती पण रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने त्यांना दिल्लीच्या सर् गंगाराम हॉस्पिटल मध्ये नेले गेले पण तेथे ही उपलब्ध असलेले सर्व व्हेंटिलेटर वापरले जात होते त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर मिळू शकला नाही.

ख्याल गायकीसाठी पंडित राजन साजन मिश्रा हे बंधू जगभर परिचित होते. २००७ मध्ये राजन याना पद्मभूषण सन्मानाने गौरविले गेले होते. अमेरिकेसह अनेक देशात त्यांच्या मैफिली झाल्या होत्या. त्यांना प्राणी आणि पक्षी यांचे विशेष प्रेम होते.