नवविवाहित जोडप्याने असे करावे ‘फायनॅन्शियल प्लॅनिंग’


लग्न, विवाहसंबंध म्हटले, की जबाबदाऱ्या वाटून घेणे आलेच. जबाबदारी घराची असो, मुलांची, नातेवाईकांची असो, किंवा घरखर्चाची, भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची असो, आजकाल पती आणि पत्नी दोघेही मिळून ह्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहेत. दाम्पत्यजीवनामध्ये वर्तमानातील आर्थिक गरजा पुरविणे आणि भविष्यकाळासाठी तरतूद करून ठेवणे ही जबाबदारी अतिशय महत्वाची असते. त्यासाठी दाम्पत्यजीवनाला सुरुवात करतानाच पती आणि पत्नींनी ह्या गोष्टीचा आधीपासूनच विचार केला, तर ही जबाबदारी पेलणे फरे कठीण वाटणार नाही.

दाम्पत्यजीवनाला सुरुवात करताना पती आणि पत्नी दोघांनीही आपापली मिळकत आणि आपले आवश्यक खर्च ह्यांची कल्पना एकमेकांना द्यायला हवी. दोघांची एकूण मिळकत आणि खर्च लक्षात घेऊन कितपत बचत करता येणे शक्य होणार आहे, किंवा कुठे किती आर्थिक गुंतवणूक करता येणे शक्य होणार आहे ह्याचा अंदाज घेता येतो. तसेच पती किंवा पत्नीपैकी कोणीही नोकरी बदलण्याच्या किंवा सोडण्याच्या विचारात असेल, तर तशी स्पष्ट कल्पना आपल्या जोडीदाराला देणे अगत्याचे आहे. जर नोकरी बदलली, किंवा सोडली तर दुसरी नोकरी मिळेपर्यंत आर्थिक तरतूद काय असेल ह्याचा विचार करून त्यावेळी खर्च कसा आणि किती करायचा ह्याचा आपापसात विचारविनिमय करावा.

आपली एकूण मिळकत लक्षात घेता एकत्रित खर्च करण्याची रक्कम किती आणि वैयक्तिक खर्चासाठी रक्कम किती ठेवायची ह्याचा विचारही करावा. त्याचप्रमाणे आर्थिक गुंतवणूक एकत्र करायची की ज्याची त्याने वेगळी करायची, बँकेतील खाती एकत्रित ठेवायची कि वैयक्तिक खाते देखील ठेवायचे हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. तसेच घरभाडे भरायचे असल्यास, किंवा वीज बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, वाणसामान ह्यांच्यासाठीचा, तसेच इतर आर्थिक गुंतवणूकीचा खर्च कोणत्या खात्यातून केला जावा ह्याचा विचार करणेही अगत्याचे आहे.

आपली मिळकत ही आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी सुद्धा असते हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने तरतूद करावी. पती किंवा पत्नीच्या घरच्या मंडळींना आर्थिक सहाय्य द्यावे लागत असेल, तर त्याचाही विचार आर्थिक तरतूद करताना करायला हवा. जर बचत खाते एकत्रित असेल, तर किती पैसे कुठे खर्च करायचे ह्याचा विचार आधीपासून करणे आवश्यक आहे. ह्या बाबतीत मतभेद टाळावेत.

आपल्या मिळकतीतील किमान वीस ते तीस टक्के रक्कम बचत म्हणून बाजूला टाकण्याचा प्रयत्न करावा. सर्वात आधी बचत, त्यानंतर आवश्यक ते खर्च, म्हणजेच घरभाडे, किंवा घरासाठी घेतलेल्या कर्जासाठी हप्ता, बिले ह्यांसाठी तरतूद केलेली असावी. बचत म्हणून जमा होत असलेल्या पैशांची गुंतवणूक योग्यप्रकारे करावी. ह्याबाबत गरज लागल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे नजीकच्या काळामध्ये करावे लागणारे खर्च आणि काही महिन्यांनी करावे लागणारे खर्च ह्यांचे अंदाज घेऊन त्याप्रमाणे तरतूद करावी. तसेच किती बचत करायची ह्याचे निश्चित ध्येय ठरवावे.

आरोग्यविमा आणि जीवनविमा हे देखील आर्थिक तरतुदीचे महत्वाचे भाग आहेत. ह्या दोन्हीमध्ये गुंतवणूक अवश्य करावी. आजकाल ज्या कंपनीमध्ये नोकरी असते, ती कंपनीच बहुधा सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्यविमे करवीत असते. पण तसे प्रावधान कंपनी तर्फे केले गेले नसल्यास वैयक्तिकरित्या ही तरतूद करणे गरजेचे आहे.

Leave a Comment